Please note these poems are not written by me !!==================================================================
----------------------------------------------------------------------------------------------
==================================================================
वसंताचे नव्याने स्वर उमटले
डहाळीवर अचानक फूल फुलले
'नको पाहूस स्वप्ने तू उन्हाची'
दवाला मंद तार्याने विनवले
'नका बुडवू मला' मूर्ती म्हणाली
'पुन्हा या पुढिल वर्षी'बोल घुमले
नसे मजकूर कोरे पत्र त्याचे
न लिहिताही मला सारे उमजले
'क्षितिज ओलांडले की गाव माझे'
म्रुगाने शेवटी वाळूस म्हटले
पुन्हा गुंतायचे नाहीच केव्हा
असे प्रत्येक वेळी मी ठरवले
तुझा जो प्रश्न होता तोच माझा
तुझे उत्तर मला नाहीच सुचले
लपंडावात हरले शब्द माझे
गझल सगळीकडे शोधून थकले
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
वरवर जगास आता मी शांतच भासत असतो
पण हृदयातिल ह्या लाव्हा नेहमी उफाळत असतो
आपुलकी नसते पाण्याची तलावामध्ये डुंबणार्याला
प्रेम तयाचे पाण्यावर, जो काठावरुनी पाहत असतो
कसे कळावे त्या पिल्लाला, "राजहंस मी बदक नव्हे"
पाण्याचा ह्या गढुळ आरसा चित्र वेगळे दावत असतो
नसेल बोलायचे तुला तर, नको बोलु, पण हास जरा
तुझ्याच हास्यातून, उन्हातहि, चांदणेच मी झेलत असतो
प्रेमातूनच जन्मा यावे, प्रेमाने ओथंबुन जावे
प्रेमच केवळ बरसविणारा मेघ हेच तर सांगत असतो
कधी सकाळी टीव्हीवरती वासुदेव गाताना दिसतो
देत उजाळा जुन्या स्मृतींना मीहि नव्याने गुंगत असतो
येतात किती! बसतात किती! उठतात किती! जातात किती!
बागेमधला बाक लाकडी शांतपणे हे साहत असतो
स्वातंत्र्य मिळाले? कोणाला पण? कशास आणिक ?
गांधीजींचा उघडा पुतळा उन्हामध्ये तर तळपत असतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
येती विचार, जाती विचार...जिथल्या तिथेच सारे !
मेंदू बधीर, मन थंडगार...जिथल्या तिथेच सारे !
हेही करीन, तेही करीन, म्हणतो मनोमनी मी...
स्वप्नेच फक्त माझी हजार...जिथल्या तिथेच सारे !
मज डावलून, संधी हसून गेली अनेक वेळा...
मीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे !
होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे !
ठरवून भेट, केव्हा न थेट झाली तुझी नि माझी...
भेटीवरून चर्चाच फार...जिथल्या तिथेच सारे !
डोळे मिटून, गेली निघून काळापल्याड आई...
ती वेळ, काळ, तारीख, वार...जिथल्या तिथेच सारे...!!
हा व्यर्थ खेळ, साराच वेळ गेला असाच वाया...
झाली न जीत, झाली न हार...जिथल्या तिथेच सारे !
नुसताच गर्व, बदलून सर्व म्हणतोस टाकले तू...
माऱू नकोस बाताच यार...जिथल्या तिथेच सारे !
नाही अजून, नाही अजून देहापल्याड गेलो...
माझे विचार, माझे विकार...जिथल्या तिथेच सारे !
तो यामुळेच, जिथल्या तिथेच थांबून राहिलेला...
दुसऱ्यांवरीच त्याची मदार...जिथल्या तिथेच सारे !
वाटेल हेच, राहो असेच...पण राहणार नाही -
- ती वाट, ती नदी, झाड, पार...जिथल्या तिथेच सारे!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला
भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला
माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
जो सुचला तो धरला रस्ता
माझा नक्की कुठला रस्ता ?
चौकाशी छाटण्यात गप्पा
तो बघ, तिकडे रमला रस्ता
ज्याने तुझियापाशी नेले
मजला तो आवडला रस्ता
टाळ, मृदुंगाच्या नादाने
वारीचा दुमदुमला रस्ता
प्रवास जेव्हा संपुनी गेला
कळले, सारा चुकला रस्ता
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !
सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
सुटे ती...पोचण्याआधीच मी
- अशी माझीच का गाडी हुके ?
पहाटेचीच त्याला ओढ का ?
पहाटेलाच का वेढी धुके ?
तिथे तो...तूच तू आहेस का ?
तिथे जो दूर तारा लुकलुके ?
उभे आयुष्य द्यावे लागले...
मिळाले अर्थ का कविते, फुके ?
पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !
कधी मी एकदा चुकलो जरा...
स्मरे ती चूक अन् मी चुकचुके !
कधी शिकलास माणुसकी अशी ?
कधी शिकलास तू इतकी बुके ?
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !
क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!
तुझे ऐकेन मी काही कसे ?
जरी हाती तुझ्या हे दंडुके !
किती हे राज्य दुःखाचे बडे...
किती आहेत जिल्हे; तालुके !!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
चीडही दिसेना कोठे; राग दिसत नाही !
पेटल्यां मनांची आता आग दिसत नाही !
तेज याज्ञसेनीचे तू आज शोधशी का ?
आज यज्ञ नाही कोठे...याग दिसत नाही !
पाठलाग माझा आता मी कसा करावा ?
मज अजून माझा येथे माग दिसत नाही !
खूण दंशल्याची देते डागण्या मनाला...
शोध घेउनीही कोठे नाग दिसत नाही !
जे नकोच; त्याचे केले दान मी जगाला...
-पण कुणास माझा हाही त्याग दिसत नाही !!
ही दुपार...टाकू कोठे अंग सावलीला ?
आसपास एखादीही बाग दिसत नाही !
ऐकलेच नाही माझे शिंकणे कुणी का ?
माध्यमांत बोभाटा वा गाग दिसत नाही !!
वेगळा मुखवटा त्याने घातला असावा...
आजकाल चंद्रावर तो डाग दिसत नाही !
तेवढीच पाने कोणी फाडलीत माझी ?
या कथेत माझा कोठे भाग दिसत नाही !
हे खरेच, डोळे आता उघडले तुझेही...!
- पण अजून तुज आलेली जाग दिसत नाही !!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो
पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो
मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो
सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो
साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
एवढीशी काच आहे आरसा
केवढा पण जाच आहे आरसा
मी कधीचाच फुटलो अन् बिखरलो
हा नवा कोराच आहे आरसा
ओळखीचे हासला नाही कधी
राहिला परकाच आहे आरसा
दूर ह्याला ठेव तू सखये बरे
हा जरा 'तसलाच' आहे आरसा
धनिक सारे रूपसुंदर देखणे!
काय घेतो लाच आहे आरसा?
हासरा दिसलो कधी मी ज्यामधे
ना असा बनलाच आहे आरसा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
माझे कसे म्हणावे संबंध मी कुणाचे,
माझे कुणा म्हणू मी, झाले कुणी कुणाचे?
श्वासात गुंगवूनी आश्वासनेच देती
प्राणात ना भिनावे ते वास अत्तराचे....
बेभान होउनीया गातील गोड गाणी
माझ्या कथेव्यथेशी नाते नसे स्वराचे....
शब्दातली खुमारी बांधी प्रबंध येथे
माझे विचार नाही उच्चारलेत वाचे....
स्पर्शात मार्दवाचा रेशीमभास होतो
का त्यात जाणवावे व्यर्थत्व बेगडाचे....
संबंध मानताना व्यक्ती गुलाम होतो
का मी हरून जावे स्वातन्त्र्य या मनाचे....
वेडा म्हणाल किंवा माथेफिरू दिवाणा
स्वीकार होत नाही नाते मनी कुणाचे....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
भावभोळी भक्ति माझी राधिकेला भावली रे
आज कान्हाच्या कृपेची बासरी नादावली रे...
देव आहे बापआई पोरक्या जीवास माझ्या,
ऐकुनी आकांत वेडा, माउली ती धावली रे...
मानसीच्या शिंपल्याचे मोहमोती साठलेले,
माळ त्यांची अर्पिण्याला त्यागसूत्रे ओवली रे...
या जगाशी झुंजताना ताप होतो अंतरी या,
सर्व कष्टातून काढी आज त्याची सावली रे...
त्यास ठावे काय माझा पुण्यसाठा संचिताचा
तोकडी माझी तपस्या, नाम घेता पावली रे...
अर्पिण्या देवास काही आगळे माझे असे ना,
ग्रास घे सर्वस्व माझे, माय प्रेमे जेवली रे...
आज माझी प्रेमवल्ली पुष्प देई भावनांचे
त्या सुवासाची धुमारी आसमंती मावली रे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
दाही दिशा हिंडून मी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?
साऱ्याच पापांची अता शिक्षा मला घाऊक दे...
फेरी नको लादू नवी...लादू नको वारी पुन्हा !
ऐकून आधी घेतली...समजून घेऊ दे अता...
तू सांग संकोचाविना घडलीं कथा सारी पुन्हा !
टीकेस घाबरतोस का...? निंदेमुळे खचतोस का...?
तू धीर गोळा कर जरा...ठरशील तू भारी पुन्हा !
मज शब्द हे काही पुन्हा मोहात पाडू पाहती...
संन्यस्त मी...! कविते मला केलेस संसारी पुन्हा !
करतोस तू उपकारही...देतोस वर जाणीवही...
मिंधा तुझा आहेच मी...! आहेच आभारी पुन्हा !
पाडाव माझा होउनी कित्येक वर्षे लोटली...
माझ्यावरी केलीस तू का ही नवी स्वारी पुन्हा ?
फुटतो जरी डोळा तरी मरतात शुक्राचार्य का ?
बसती नव्या काळातही अडवून हे झारी पुन्हा !
गेला उजाळा तो कुठे, इतक्यात मी जो पाहिला...
माझ्यापुढे आली कशी ही वाट अंधारी पुन्हा ?
झोळी पुन्हा हातात ही...? हाळी पुन्हा ओठांवरी...
नशिबात माझ्या शेवटी ही तीच लाचारी पुन्हा !
'आईस का तू लाजशी...? मुकशील प्राणांना अरे...!'
दुर्योधनाला सांगते विनवून गांधारी पुन्हा!!
डोके कशाला खाजवा...? मेंदू कशाला चालवा...?
बोलेल जो आधी कुणी, त्याचीच ओढा री पुन्हा!!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
पाठीस बाळ आहे, शोधायचा कशाला?
जेवून तृप्त का हो शोधाल पाकशाला...
नाभीतली सुगंधी कस्तूरिच्या मृगाची,
त्यालाच ठाव नाही, पंकात मग्न झाला...
पाठीवरी पिसारा, मोरास जाणवेना,
पाया कुरूप पाही आणून आसवाला...
दौहित्र श्राद्ध घाली, स्वर्गात पोचवीतो,
पुत्राविना कसा रे हा जन्म फोल झाला...
छावा चुकून आला झुंडीत कोकरांच्या,
त्यांच्यासवे चरावा का व्यर्थ झाडपाला...
स्वाधीन शक्ति वाया, लेखून क्षुद्र कोणी,
धावे पराश्रयाला, हा बुद्धिभेद झाला...
गीतार्थ सांगताहे, मी एक ब्रह्म आहे,
हा देहमोह सोडा, दु:खे रडा कशाला...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर
काठ्यांच्या गर्दीत विसरता
गोवर्धन "त्या" करंगळीवर
नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा
मासे तडफडती काठावर
का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
ऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,
फूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का?
धान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,
हाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का?
वाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,
जीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का?
चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?
कोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,
मोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का?
लौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,
दैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का?
देव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,
उग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
हाय, कसा विश्वास हरवला
समर्पणाचा ध्यास हरवला ।
तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।
सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।
जगण्याला धुंदी स्वप्नांची
विस्मृतीत इतिहास हरवला ।
युगाहुनी मोठा असणारा
प्रतीक्षेतला तास हरवला ।
सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
मानवाच्या जीवनाला, काय दैवा, शाप आहे?
तो कुणाचा पुत्र आहे वा कुणाचा बाप आहे...
अन्नवस्त्राची शिदोरी पोसते आहे तनूला,
तेवढ्याने होत नाही, भावनांचा व्याप आहे...
कोणत्या नाजूक वेळी तोकड्या शक्तीस याच्या,
धीर देण्या माउलीचा हात देतो थाप आहे...
आपल्या पाठी उभा आहे पिता या भावनेने,
हिंमतीचा जोर येतो, शत्रुची का टाप आहे...
खुंटल्या यत्नास जेंव्हा मार्ग दावाया कुणाच्या
युक्तिचा आधार लाभे, आदराची छाप आहे...
साथ देण्या भावनांना, जाणुनी त्या पातळीने,
जीव लावी हेच मोठे सख्यभावा माप आहे...
या मनाला गुंतवाया मोहुनी सर्वस्वभाना,
भामिनीच्या डोळियांचा कामदेवी चाप आहे...
एक धागा हा सुखाचा लाभतो प्रेमात मोठा,
जीवनी संगीत वाटे, घेतसे आलाप आहे...
सर्व संबंधांस साधा, भावनेला साथ देती,
नाचतो त्यांच्याप्रमाणे, लागते रे धाप आहे...
ना कधी होते मनाचे मानल्या इच्छेप्रमाणे,
वेळ येता दे दगा ते आपुले, हा ताप आहे...
ज्या भरोशाने जगाला लाविलेले ऊरपोटी,
तो तुटे, हा भावनेला वेदनेचा राप आहे...
शास्त्र सांगे सोडुनी द्या, मोहमायेचा पसारा,
वागणे ना त्याप्रमाणे, कोण जाणे पाप आहे...
काव्य देई या मनाच्या भावनांना वाट सोपी,
लेखणी हाती धरावी, एवढा उ:शाप आहे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
घडोघडी पडो झडो तरी पुढेच जात जा,
घडो प्रयास आसयुक्त, ध्यासगीत गात जा...
करील वंचना कुणी, नसो विवंचना मनी,
'करीन' हीच जिद्द बाळगून धाडसात जा...
असेल जी तुझ्यात शक्ति, तोच आसरा खरा,
असे उधार वा भिकेत दुष्प्रभाव, चेत जा...
जयांस लाभले सुदैव शक्तिबुद्धिचे भले,
जयात ते तुझ्या प्रसन्न, आदरास देत जा...
तुझ्याहुनी असे कुणी अशक्त, दुर्बलास त्या,
तुझ्या बरोबरीस घेत सांत्वनाच देत जा...
जगात वीर विक्रमी बनेन, हाव ही नको,
जगावयास सौख्यलाभ थोडक्यात घेत जा...
नसोत भव्य भाव 'या जगास मी सुधारणे',
नसो प्रपंच व्यर्थ हा, तुझाच शोध घेत जा...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले
मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले
तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले
आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले
शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले
सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?
मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?
हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले
शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्याने मोजले!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
खूप काही सहन करतो मजबुरीने....
मजबुरीचा राग येतो मजबुरीने....
तेच जगणे तेच मरणे जीवनाचे
हेच गाणे रोज गातो मजबुरीने
प्रेम करतो मी तुझ्यावर एवढे की,
की , तुझा मग राग येतो मजबुरीने
जिंकलो कित्येक मी मोठ्या लढाया
पण तुझ्याशी सहज हरतो मजबुरीने
हौस मृत्यूची इथे आहे कुणाला
शेवटी माणूस मरतो मजबुरीने
देह - विक्री अन खरेदी भूक आहे
प्रश्न साधा कठिण बनतो मजबुरीने
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता
तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता
जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता
इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता
असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे ना जग जरा उजळून तू !
आंच दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?
वेळ भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !
संपलो मी ! वैर माझे संपले...
जा फुले माझ्यावरी उधळून तू !
दुःख झाले कोणते इतके तुला ?
हासशी सर्वांग का घुसळून तू ?
काळजाला सल पुन्हा काट्यापरी...
...आणि मग डोळ्यांत जा तरळून तू !
फेकली कोणी तळाशी पौर्णिमा ?
काढ अंधारास या ढवळून तू !
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
चारचौघांसारखा आहेस ना ?
चारचौघांच्यात जा मिसळून तू !!
शब्द तू एकेक हा घासून घे...
अर्थही एकेक घे विसळून तू !!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही
किती विचारास बाक आला, किती सुरकुत्या...
त्वचा चमकते तरी कुणी यौवनात नाही!
उदार धोरण; खुली व्यवस्था; समान संधी -
असा तवा तापला व दाणा घरात नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
ओळींचे जंजाळ कशाला..?
शब्दांची आबाळ कशाला..?
निर्मळ पाणी डोळ्यांमधले
अभिव्यक्तीचा गाळ कशाला..?
शांती ह्रदयातच शोधावी..,
फिरतो रानोमाळ कशाला...?
या भजनातच भक्ती नाही..!
..ढोलक आणिक टाळ कशाला..?
तो त्याच्या मरणाने मरतो..
यावा लागे काळ कशाला ?
बदफैली ही जातच ज्याची,
त्याला कुठली नाळ कशाला .?
सहवासाने फुलवू ह्रदयी,
चंद्राला आभाळ कशाला ...?
थार्यावरती नाही जे मन,
त्याचाही सांभाळ कशाला ..?
जगताना जे जळतच गेले,
त्या प्रेताला जाळ कशाला ..?
चाल तुझी...अन् ताल धरी मन,
..तुजला पैंजण, चाळ कशाला...?
मी तर कबुली देतो आहे..
तुमचे खोटे आळ कशाला ...?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
भेटती जपून टवटवीत चेहरे किती!
सोबतीस आणती सुगंध बोचरे किती!
मी अजून खरवडून चेहऱ्यास पाहतो
ह्या चऱ्यांशिवाय आत आणखी चरे किती?
प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?
झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास? वाटले बरे किती?
"तूच सांग आजकाल चालले कसे तुझे?"
चार शब्द बोललीस, वाटले बरे किती!
घाव दाखवून मी तुझ्यासमोर नागडा
अन् तुला फिकीर लोंबतात लक्तरे किती?
चाललो नसेन मी अजून चार पावले
मी करायची अजून पार अंबरे किती?
गाजतील मैफलीत शब्द आज, पण उद्या?
राहतील येथल्या धुळीत अक्षरे किती?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये !
तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !
एकटी सोडू नये संधी कधी
दूर संधीला पळू देऊ नये !
खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
वेळ गेलेली पुन्हा येईल का ?
वेळ आलेली टळू देऊ नये !!
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`
मावळू दे सूर्यही अन् चंद्रही...
मात्र आशा मावळू देऊ नये !
शक्य हे प्रेमात आहे का कधी...?
- जीव मी माझा जळू देऊ नये...!
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
मला मनाचे पटले नाही
वाद आमचे मिटले नाही
मला नेहमी ऐकू येते
मनातही जे म्हटले नाही
राग तुला याचाच असावा
नाव तुझे पुटपुटले नाही
मला भेटल्या जखमा सुंदर
कुणात मन गुरफटले नाही?
अभिलाषेचे वादळ आले
पाय काधी लटपटले नाही
फक्त ठेवले नावा पुरते
नाते मी विस्कटले नाही
शब्द आणले उधार थोडे
दुःख तरी पण नटले नाही
तुझे एवढे कर्ज उरावर
या श्वासांनी फिटले नाही
नको नकोसे जगणे झाले
पाश तरी पण तुटले नाही
तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये
व्यसन कधी मग सुटले नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
ॠतू वाहणारे किती मी सहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे ।[ही ़ किरण येले यांची गझल आहे.त्यावरील तरही गझल.]
तुझ्यावीण येथे कसे मी रहावे
तुझे चंद्र आता कसे सावरावे?
सख्या सांग झाला गुन्हा कोणता रे
तुझे मौन आता कसे साहवावे?
तुझे श्वास नसता इथे आस-पास
दिव्याने असे वांझ का फडफडावे ।
तुझ्या आठवांना क्षणी ना विसावे
कसे सांग माझ्या मना आवरावे ।
अरे कात टाकोनि आले नव्याने
नव्या या शरीरी तुला गोंदवावे ।
कुठे मागते मी सुखातील वाटा
तुझ्या आतले फक्त तू घाव द्यावे ।
असा तू,तसा तू,विदेही जसा तू
तुझ्यातुनी मुक्त मी वावरावे ।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
आटुनी गेले जिव्हाळे,जाग आली
कातडीवर आळ आले,जाग आली ।
वास्तवाशी तह नव्याने काल केला
आणि पुन्हा युद्ध झाले,जाग आली ।
का नव्याने शोधिली कृष्णात भक्ती
का मिरेचे विष प्याले,जाग आली ।
वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।
भावनेच्या मखमली गुंगीत जाता
स्वप्न कासावीस झाले,जाग आली ।
आठवानी खरवडे जखमा पुराण्या
तरुण सारे घाव झाले,जाग आली ।
मी तुला माझ्यातुनी 'चल जा!'म्हणाले,
आणि माझे प्रेत झाले! जाग आली ।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
इथे अनंत घाव मी जपून ठेवले
प्रचंड आज दाह मी जपून ठेवले ।
विखुरलेस चांदणे इथे कसे तुझे?
इथेच चंद्र हाय मी जपून ठेवले ।
मागतेस काय आज मागची फूले
तसे कुठे गं काय मी जपून ठेवले?
काल तू जिथे हळूच ओठ टेकले
अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले ।
आपुलेच यार दोस्त भेटले तरी
मैफलीत पाय मी जपून ठेवले ।
काय व्यर्थ वटतसे प्रित ही तुला?
हाय रे! कुणास मी जपून ठेवले !
झेलले कितीक कष्ट काल माय ने
खडबडीत हात मी जपून ठेवले ।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते
कितीदातरी सांडले रक्त आम्ही
कितीदातरी वाळली खिन्न शेते
कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते
असे मुक्तता आत्महत्याच ज्याची
धन्याची चिता पाहती खिन्न शेते
नवे हात आलेत राबावयाला
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
आलीस पावसाची, भिजवीत पावसाला
आली मशाल कैसी , जाळीत पावसाला !
भर पावसात पडले उन कोवळे जरासे
आले जसे किरण हे माळीत पावसाला ।
पदरात झाकले तू लावण्य मुक्त जैसे
हळुवारश्या रुपेरी कल्हईत पावसाला ।
घोटात राख वाटा तू कोरड्या गळ्यांचा
कवितेत काय बसला पोशीत पावसाला !
चिक्कार झाली झाडे,चिक्कार झाली शहरे
प्रगतीस ओघ आला, विझवीत पावसाला ।
'है हिम्मते खुदा तो',पिकवून दाव बागा
वाचीत काय बसला राशीत पावसाला ।
अंगाई गात वारा, सोडून आज मस्ती
धारांमधून जातो निजवीत पावसाला ।
थंडी गुलाब झाली,भिजला दवात वारा
चल ये मिटून घेऊ दुलईत पावसाला ।
पाण्यास काय झाले ,का नाचल्या त्सुनामी
वरचेवरी भयाने गोठीत पावसाला ।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
मनात आले गैर कुठे?
ही सत्याची सैर कुठे?
चल ये फिरुनी मिठीत ये
हे जन्माचे वैर कुठे?
ठरवुन घे तू पंथ तुझा
फिरशिल सैर न भैर कुठे?
मी जर पुसले ठसे तुझे
जाशिल मग तू खैर कुठे?
ठेवू म्हणतो भ्रष्ट युगी
चौथा 'वामन पैर'कुठे?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.
पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.
दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले.
विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण,
छातीवरती तलवारीचे टोक ठेवले.
देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला.
गार्हाणे मी मात्र आपुले "रोख" ठेवले.
चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली.
हिशोब होते मीही ऐसे "चोख" ठेवले..!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
राहू नकोस दूर या उदास रात्री
मनी उठे काहूर या उदास रात्री |
जरी सारले हळवेपण मी मागे
का वाटे हुरहूर या उदास रात्री ?
कळीस नाही भान दुखर्या वेलीचे
तिचा वेगळा नूर या उदास रात्री.. |
अता शमले वादळ दिवसाचे पण
अंधाराचा पूर या उदास रात्री |
मरूभूमीवर अवचित जळ तसा दिसेल
का मज सौख्यांकूर ? या उदास रात्री |
फक्त दीर्घ ही असे निराशा -बाकी
सारे क्षणभंगूर ! या उदास रात्री |
'कसे जगायचे रे ?असे खोटे? हसत?
सांग ,काय तुला मंजूर ! या उदास रात्री' |
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.
मीही तसाच आहे, तीही तशीच आहे...
लांबून एकमेकां हे चाचपून झाले.
करशील काय आता उचलून तू कुर्हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!
मज राहिला अताशा कसलाच शौक नाही.
दु:खातला विदूषक माझे बनून झाले!
माझा मलाच मी का कोठेच सापडेना?
आयुष्य भोवताली सगळे खणून झाले.
काळीज आज बहुधा झाले सुरू कण्हाया...
आत्ताच कालपरवा माझे हसून झाले!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
विस्तवाचे दान कवितेने दिले !
चांदणेही छान कवितेने दिले !
जन्म हा निष्पर्ण झाडासारखा...
एक हिरवे पान कवितेने दिले !
व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !
त्याच त्या गोष्टी जुन्या विसरून जा...
हे नवे आव्हान कवितेने दिले !
वेदना, दुःखे, व्यथा अन् आसवे...
तेच ते सामान कवितेने दिले !
जी नको ती जाण कवितेने दिली...
जे नको ते ज्ञान कवितेने दिले !
मान्य, मी ओसाड वाड्यासारखा...
हे जिणे सुनसान कवितेने दिले !
व्यर्थ ताळेबंद हा ठेवू नये...
मान की अपमान कवितेने दिले !
या तुम्हीही...एकटा घेऊ कसा...?
- जे मला रसपान कवितेने दिले !
या जगी कोण्या कवीला का कधी -
वास्तवाचे भान कवितेने दिले... ?
मौनही येते मला ऐकू तुझे...
मज अनोखे कान कवितेने दिले !
लाभले निर्भेळ काहीही कुठे...?
जे दिले दरम्यान कवितेने दिले !!
कोण मी होतो असा...माझ्याकडे -
एवढे का ध्यान कवितेने दिले ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?
यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !
व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?
हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?
जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी...
ती नशा, धुंदी तुझ्या भासात आहे !
नोंद माझी घेतली नाही कुणीही...
नोंद माझी हीच इतिहासात आहे !
ये, तुझ्या श्वासात घे मिसळून थोडे...
चांदणे माझ्याच निःश्वासात आहे !
आयता बसशील आयुष्या किती तू ?
ऊठ आता, मौज सायासात आहे !
खैर नाही आज कुठल्याही सुखाची...
आज माझे दुःख उल्हासात आहे !
ये पुन्हा मागे मला वाचायला तू...
(वाच आता नीट...मी कंसात आहे !!)
भेटलो कित्येक दिवसांनी मला मी...
आज मी माझ्याच सहवासात आहे !!
राम नाही राहिला माझ्यात आता...
मी कधीपासून वनवासात आहे !
काव्य दोघांना सुचावे...नवल नाही...!
व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे !!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.
आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.
भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.
गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.
द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
नुसत Thanks म्हणा
----------------------------------------------------------------------------------------------
==================================================================
मराठी कविता